आठवणीतील शाळा


एक असा भूप्रदेश जो तीन्ही बाजूंनी उंच उंच डोंगरांनी वेढलेला आहे.अगदी चुलीसारख्या
आकाराची रचना असणाऱ्या नदी नाल्यांनी समृध्द असणाऱ्या प्रांतामध्ये माझ्या बालपणालाअधीकच समृद्ध करणाऱ्या आठवणींमध्ये धनगरवाडा ( आजचे अहिल्यानगर ) आणि सहस्त्रमुळी या दोन गावांचा खूप सिंहाचा वाटा आहे. चुलीत जळतन घालावं तसं या डोंगरांच्या अफाट खोऱ्यात एक काळीशार डांबरी वाट प्रवेश करते ज्याला आपण रोड म्हणतो.अशा ह्या विलक्षण सौंदर्य लाभलेल्या वातावरणात धनगरवाडा की ज्याला आम्ही वाडा म्हणायचो आणि सहस्त्रमुळी ही आमची दोन गावं लागोपाठ आहेत.आणि या दोन्ही गावांमध्ये केवळ दिड किलोमीटरचं अंतर आहे.आम्ही राहायचो वाड्यात इयत्ता तिसरी पर्यंतचं शिक्षण मात्र बाजूला असणाऱ्या शिरव्यालाच झालं होतं.पण शिरव्याचं आणि वाड्याचं अंतर जास्त असल्यामुळे आणि आईच्या हट्टामुळे आम्हाला सहस्त्रमुळी च्या शाळेत इयत्ता चौथी ला प्रवेश घ्यावा लागला होता.वाड्यापासून सहस्त्रमुळी पर्यंतच्या अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरात तीन लहान लहान नाले आणि एका नदीचा समावेश होता ज्यामध्ये शाळेला दांडी मारून खेकडे आणि मासे पकडण्यात आमचा पूर्ण दिवस जायचा.आणि अगदी बरोबर नदीच्या थोडं वर आल्यावर  सहस्त्रमुळी ची शाळा वसलेली होती.शाळेची रचना म्हणजे दोन भल्यामोठ्या खोल्या.त्यामध्ये दोन वर्ग बसत असत. एका खोलीत पहीला अणि तिसरा आणि बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या खोलीत दुसरा आणि चौथा.आता आम्ही म्हणजे मी आणि माझा मामेभाऊ निंबाजी. आमच्या दोघांमध्ये उंची,रंग आणि चेहऱ्याची हनुवटी असं बरचसं शारीरिक साम्य असल्यामुळे आम्ही सेम दिसायचो पण विशेष बाब म्हणजे आमचा ड्रेस कोड पण सेमच असायचा कारण आम्ही आतेभाऊ मामेभाऊ मिळून सात आठ जण होतो.त्यामुळे कदाचित आमच्या घरच्यांना आर्थिक बाबतीत ते परवडत असेल कारण अगदी दिवाळी दसरा जरी असला तरी आमचा ड्रेस कोड चेंज होत नसे.
                    मग त्याला आमचा शालेय गणवेश तरी कसा अपवाद राहणार?त्यामुळे आम्ही  सहस्त्रमुळीच्या या नविन शाळेत एक वेगळेच दिसत होतो.नवीन शाळा,नवीन पोरं, नवीन शिक्षक असं सगळं काही नविनच होतं त्यात आणखीनच मुलं आम्हाला शिक्षकांबद्दल  भीती दाखवून देत असत शिरव्याच्या शाळेत सर म्हणण्याची पध्दत होती.पण इथे गुरुजी म्हणावं लागत असे.शिरव्याची शाळा आधुनिक जास्त होती पण त्या उलट इथे सोयीसुविधा पूर्ण उपलब्ध नसताना ही शाळा केंद्रातून प्रथमच येत असे.कारण इथे दुसऱ्या वर्गाचे पोरं सर्रासपणे पंचवीसचा पाढा गिरवत असत ते सुद्धा पाढे लिहलेल्या भिंतीकडे पाठ करून!
            आणि हे ज्ञानाचं अदभुत जग ज्या महान व्यक्तींनी बनवले होते ते त्या दोन महान व्यक्ती होत्या राणे गुरुजी आणि किनगे गुरुजी. त्यापैकी आम्हाला जे वर्गशिक्षक होते ते राणे गुरुजी.पूर्ण नाव "प्रभाकर सिताराम राणे"        त्यांच्या सहा फूट उंचीला एक ही इंच कमी नव्हता.पूर्ण सहा फूट उंच आणि त्यांच्या त्या विलक्षण उंचीला शोभेल असा कृष्णवर्णीय देह त्यांना लाभला होता.आणि आहे.गुरुजींचा पोशाख म्हणजे मोठ्या पोंग्याचा सफेद पायजमा आणि कुर्ता असे हे आमचे गुरुजी तालुक्याच्या ठिकाणाहून आठ किलोमीटर अंतर आपल्या एटलास सायकल वरून सर करून येत  असत.गुरुजींच्या दणकट आरोग्याचं श्रेय कदाचित मला वाटतं त्या सायकलला जात असावं.पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचे दोन महिने ती सायकल या ज्ञानाच्या महाममेरूला ने आन करण्याची प्रक्रिया करत असे.आणि त्या सायकलचा एक अतिमहत्वाचा अलंकार होती एक लाल पांढऱ्या रंगाची घट्ट विणीची कापडी पिशवी.गुरुजींची सायकल नदीच्या त्या उंच तीरावर आली म्हणजे शाळेत एकच खळबळ माजून जात असे गुरुजी आले... गुरुजी आले...शाळेत सायकल आली म्हणजे गुरुजी तीला एका भिंतीला लावून देत आणि मग  ती दीर्घ आराम करत थंडगार सावलीत बसून राहत असे. सायकलवरून गुरुजी उतरले म्हणजे गुरुजी पूर्ण घामाघूम झालेले असायचे.शाळेत सायकल पोहचताच गुरुजींच्या सायकल जवळ जाणारे काही मोजकेच जण असायचे गुरुजींच्या सायकल जवळ जाण्यासाठी एक वेगळाच दर्जा लागायचा तो म्हणजे तिसापर्यंत पाढे तोंडपाठ आणि स्वाध्याय पूर्ण त्यामुळे त्यासाठीची  पात्रता माझ्याकडे नव्हती.म्हणून मी दुरवरूनच गुरुजींचं अवलोकन करून घेत असे की नेमकं गुरुजींचा मूड कसा आहे.मी ' ढ ' असल्यामुळे शाळा आणि गुरुजी या दोघांचं खूप वाईट बघायचो कधी मनात विचार येई गुरुजी पावसात भिजून आजारी पडायला पाहिजे आणि आठ दिवस सुट्टी मिळायला पाहिजे.तर कधी वाटे गुरुजींची सायकलच पंचर व्हायला पाहिजे. म्हणजे असा मी गुन्हेगार वृत्तीचे विचार करत असायचो म्हणजे अगदी ती निरागस सायकलला सुद्धा मी वाईट नजरेने बघायचो.गुरुजी शाळेत पोहोचले थोडा आराम झाल्यावर शाळा भरत असे सुरुवातीला राष्ट्रगीत आणि मग प्रतिज्ञा आणि या शाळेत एक नवीन पध्दत होती जे आम्हाला ठाऊकच नव्हती ती म्हणजे सुविचार सांगणे पोरं एकदम भारी.. भारी सुविचार सांगत असत आणि ते आमच्या डोक्यावरून निघून जात असत. मला आठवतं तीन महिने  झाल्यानंतर गुरुजींनी मला बळजबरीने पुढे बोलवून सुविचार सांगायला सांगितला तेव्हा निर्लज्जस्पद माझा सुविचार होता " दररोज दात घासून यावे " कसातरी तो घाबरत.. घाबरत सादर केला होता पण जसा ओट्यावरून खाली उतरलो आणि रांगेत येऊन उभा राहिलो तस्स गुरुजींनी कॉलर पकडून मारलं आणि म्हणाले तीन महीने झाले तरी अजून दातच घासायचे चालले तुझे! चल आत्ताच्या आता दुसरा सुविचार सांग खूप विचारांची डोक्यात देवाण घेवाण केल्यानंतर वर्गात भिंतीवर लिहिलेला एक आठवला तो होता " शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे " तेव्हा कुठे गुरुजी म्हणाले जमलं रे आता..तेव्हा कुठेतरी बरे वाटले होते.
सहस्त्रमुळीच्या शाळेत शिक्षा करण्याची एक भिन्न भिन्न पध्दत होती.जी बऱ्याचशा शाळेंपैकी वेगळी होती.ती म्हणजे मुलांना काही जमत नसेल किंवा काही चुकी झाली असेल तर मुलींनी मुलांच्या काना खाली वाजवायची. आमच्या वर्गात दोनच मुली होत्या.यदाकदाचित त्या दोन्ही पण घरी असल्या तर राणे गुरुजी तिसरी च्या मुलींना आमंत्रित करत. पण मार मुलींचाच खावा लागत असे.आणि त्याची मलाच जास्त गरज पडत असे.एखाद्या मुली सोबत जर आधी काही खटका उडेल असेल आणि ती जर विशेष आपल्यासाठी आमंत्रित असेल तर समजून घायचं की आज परतफेड होणार.एखाद्याचं जर एखाद्या मुलीसोबत फार जुनं वैमनस्य असेल तर त्याच्या गालावर ठळक पाची बोटं उमटलेली असत.मी आणि निंबाजी अभ्यासात हुशार नसल्यामुळे बऱ्याच वेळा राणे गुरुजी आम्हाला इयत्ता दुसरीत बसवत असत. हा सुद्धा एक राणे गुरुजींचा शिक्षेचाच प्रकार होता.
           आज ही माझ्या स्मरणात आहे ती राणे गुरुजींची शिकवण्याची पध्दत मराठी तर ते अप्रतिम शिकवत असत.इयत्ता चौथीत मराठीत एक सांकव नावाचा धडा होता अक्षरशः तो धडा शिकताना आम्हाला कोकणात असल्याचा भास होत असे.तीच गंमत त्यांच्या कविता शिकवण्यात ही होती.मला आठवते की " वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे " ही कविता कमीत कमी दोन ते तीन महिने शेवटच्या तासाला  सर्वांमिळून ताला सुरात ती गायली जायची.गुरूजींना फक्त मुलांनी कविता ताला सुरात गावी एवढीच अपेक्षा नसे तर त्या सोबत अभिनय ही करता आला पाहिजे याची सुध्दा अपेक्षा असे सायंकाळी दुसरा आणि चौथा आमचे दोन्ही वर्ग मिळून कवितेचा तास असायचा.बऱ्याच वेळा कितीतरी हास्याचे फवारे ही उडत असत.एक कविता होती " कोणाचे गं कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील  मास्याचे की माझ्या बाळाचे " इथे व्हायचं काय की!बऱ्याच मुलांना हातात बाळ घेऊन ती बाळाला लाडवण्याची पध्दत मुलांना जमत नसे त्यामुळे बरीच मुलं मार खात असत. पण खरी गंमत तेव्हा यायची जे मुलं गुरुजींचा मार खाऊन रडत रडत बाळाला झुलवण्याचा अभिनय करत.              
       प्रात्यक्षिक हा राणे गुरुजींच्या  अध्यापनाचा जीव की प्राण होता. अफजलखानाच्या वधाची ही अशीच एक गंमत आहे." अफजलखानाचा वध " हा इतिहातील अजरामर धडा शिकवून झाल्यानंतर नाटक करण्याचं ठरलं आमच्यात मंगेश नावाचा एक मुलगा होता तो आम्हा मुलांमधून सर्वात उंच धिप्पाड होता त्यामुळे बिनविरोध त्याची अफजलखानपदी निवड झाली होती.पण त्याला "आवो शिवाजी " हे  वाक्य बोलून दोन्ही हात दूर सारून गळाभेटीसाठी जमतच नसे त्यामुळे गुरुजींनीच अफजलखानाला चांगला चोप दिला होता तेव्हा ही अफजलखान नाटकाचा प्रयोग संपेपर्यंत गप्प बसला नव्हता.
                     अशा रडक्या अभिनयाची प्रत्येकावरच कधी ना कधी वेळ चालून येत असे त्याला मी तरी कसा अपवाद राहणार? एके दिवशी माझी ही ती वेळ आलीच!मराठीच्या  पुस्तकातील "अति तिथं माती" हा धडा संपला होता.या धडयात राजा,प्रधान,गवई,आणि प्रजा असं बरंच कास्टिंग आहे.त्यामुळे वर्गातील कोणी राजा झालं तर कोणी प्रधान.एका मुलाचा आवाज चांगला होता त्यामुळे तो गवई झाला.उर्वरित राहिली प्रजा त्यामध्ये एक विशेष कास्टिंग होतं नवरा आणि बायको चं त्यामुळे गुरुजींची नजर गेली निंबाजी आणि माझ्याकडे कारण आम्ही दोघे जोडीनेच बसायचो निंबाजी तब्येतीने माझ्यापेक्षा दणकट असल्यामुळे त्याला नवरा केलं आणि मला बायको.
                      आता सिन असा होता की! राजा आपल्या राज्यात संगीताच्या उत्तेजनासाठी   सर्वांना एकच नियम पाळायला सांगतो की आजपासूनी सर्वांनी गाण्यातच बोलणे.त्यात माझी म्हणजे बायको ची अशी भूमिका होती की नवऱ्याला बाजारातुन सामान सांगायचं असतं ते गाण्यात...आहो "तेलं संपले... तूप संपले..मीठ संपले...स्वयंपाक मी आता करू कशाचा" हे सर्व गाण्यात गात बोलायचे होते.कितीतरी वेळा गुरुजींनी चांगल्या प्रकारे करून दाखविले तरीसुद्धा मला काही ते लवकर साध्य होत नव्हते. शेवटी गुरुजींचा मार खावाच लागला.
            त्यांनंतर माझं काम अधिकच वाढलं होतं रडत रडत गाण्यात बोलून अभिनय करणे. काय माझी ती फजिती असेल?कल्पना केलेलीच बरी.अशा एक नाहीतर अनेक गोष्टी राणे  गुरुजींबद्दल सांगता येतील
                गुरुजी जेवढे कडक अणि शिस्तबद्ध होते तेवढे मायाळू पण होते.उशीर झाल्यावर कितीतरी वेळा गुरुजींच्या सायकलवर बसून जाण्याची नामी संधी मला  मिळाल्याच आठवतं.तर बऱ्याचशा मुलांची फी गुरूजी आपल्या खिशातून भरत असत.
         एवढे आम्ही अभ्यासात मठ्ठ  असल्यावर सुध्दा सहा माहिनंतर आमच्यातील जी प्रगती होती तीला तोड नाही. कारण त्या सहा महिन्यानंतर आमचे तिसा पर्यंत पाढे तोंडपाठ झाले होते.तसेच त्यानंतर प्रत्येक घटक चाचणीत पैकीच्या पैकी गुण मिळत असत एवढी मोठी प्रगती ही केवळ राणे गुरुजींमुळे झाली होती.त्यानंतर परीक्षा झाल्या तेव्हा चौथीला केंद्र राहायचं आणि आमच्या शाळेला जवळच असलेलं कोथळी हे केंद्र होतं.सर्व पेपर वगैरे झाले त्यानंतर एक मे लाच निकाल सुध्दा लागला आणि आमची ती अतिदुर्गम भागातील शाळा केंद्रातून पहिली आली होती.आणि ती फक्त आणि फक्त केवळ राणे गुरुजींमुळे आणि त्या शाळेबद्दल माझंतरी असं निरीक्षण आहे की त्या शाळेतून बाहेर पडलेली मुलं दुसऱ्या कुठल्याही शाळेत गेली तरी पहिला क्रमांक कधी सोडत नाहीत.आणि याचं पूर्ण श्रेय जातं ते राणे गुरुजींना.
     पण आजही तो काळ मला आठवतो जिथे रस्त्यांची सोय नाही,तिथे विजेची सोय नाही आणि जिथे उन्हाळ्यात तापमान आठठेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहतं तिथे राणे गुरुजींसारखा महान मानव सायकल वर दिवस काढतो. मी त्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच वेळा गुरुजींना पायी जाताना सुद्धा बघत असे.असा हा ज्ञानाचा महामेरू आजही माझा खूप आदर्श आहे अशा जीवघेण्या स्पर्धेत मी जेव्हा जेव्हा खूप उंचावर जाऊन खाली पडतो तेव्हा तेव्हा मी राणे गुरुजींचा हा संघर्ष मनात आठवतो आणि पुन्हा पुन्हा उठतो.
              राणे गुरुजींच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या माझ्या मनाच्या गाभाऱ्यात अजुनही जीवंत आहेत. जेव्हा जेव्हा मी निष्क्रिय होऊन जातो तेव्हा तेव्हा त्या मला संजीवनी देण्याचं काम करतात.
             एक नवीन पिढी जन्माला घालणाऱ्या या महान गुरूला आज शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा....💐💐

                                          - गणेश शिवाजी जाधव

Comments

  1. तुम्ही सांगितलेला सुविचार खूप आवडला

    ReplyDelete
  2. या लेखातल्या पात्रांचं वाचता वाचता कल्पनेने प्रतिबिंब डोळ्यासमोर उभं राहतं
    Great

    ReplyDelete
  3. खूप छान मला खूप खूप आवडली तुझी शाळा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दि नॉन सिरीयस..

बाजार