बाजार

आमच्या गावाचा बाजाराचा दिवस म्हणजे गुरुवार दररोजच्या दिवसांपेक्षा गुरुवार जास्त उत्साहाचा असायचा.आणि थोडा वेगळा भासायचा मजूर आणि शेतकरी ह्यांचा खास वाटाघाटीचा असायचा.मी मजूर वर्गातील असल्यामुळे माझी गुरवारी दिवसाची सुरुवात काहीशी अशी असायची...गण्या ऊठ लवकर महादेव बुवाच्या घरी जाय अन् पुऱ्या सहा दिवसाचे पैशे घेऊन ये..व्हय लवकर नाहीतं जाईन तो बजारात....
त्यांनंतर अंगणात पाट टाकू गरमागरम पाण्याने आंघोळ करून  घरातल्या देवांच्या फोटोची पूजा करून मजुरीचे पैसे आणायचे.
              आंघोळ पाणी करून गेल्यावर मजुरीचे सर्व पैसे हातोहात मिळतात अशी त्या मागची कल्पना होती. असं एकदा आईने सांगितलेलं मला आठवतं.नाही तर सावकार लोकं उडवाउडवीची उत्तरे देत असत जस की...जा आईला सांग बाजारात देतो म्हणून.म्हणजे बाईच्याजातीनं कुठे कुठे त्याला बाजारात शोधावं.त्यापेक्षा बरं नाही का?पारोशी गेल्यापेक्षा अंघोळ करूनच जावं.
             मोताळा हे तालुक्याचं ठिकाण तसं आम्हाला जवळच होतं बाजार हा तालुक्याच्या गावाला भरत असे.आमच्या वाड्यापासून तो सात आठ किलोमीटर दूर अंतरावर होता.आमच्या गावात त्यावेळेस बस दोनच वेळ यायची सकाळी नऊ आणि संध्याकाळी सहा त्यावेळी खाजगी वाहनांचा देखील शुकशुकाट होता. तसं आमचं गाव  पूर्णपणे दुर्लक्षित असल्यामुळे तिथे बसस्टॉप नव्हताच.त्यामुळे एका ठरलेल्या जागी सर्व बाया माणसं जमा होत असत.गुरुवारी मात्र बस खच खचून भरलेली असायची.त्याकाळी स्मार्टफोन नसल्यामुळे कोणीच आपापल्या दुनियेत रमलेला नसायचा.मोताळ्याला पोहचे पर्यंत अर्धा बाजार बसमध्येच होऊन जातं असे.बाजारात गेल्यावर काय घेणार,कोणाला किती द्यायचे,अमुक किती देणार? तमक्याला किती द्यायचे असा ज्याचा त्याचा हिशेब चालत असे.लेकरा बाकरांची च्याव च्याव तर वेगळीच असे.बाजारात गाडी कधी पोहचत असे ते सुद्धा कळत नसे.बाजारात आल्या आल्या आई पहिले भज्यांच्या हॉटेलात घेऊन जात असे.त्यांनतर मग बाजाराला सुरुवात.बाजारात वेगवेगळ्या साथी असायच्या त्यामध्ये सर्वप्रथम दर्शन होइ ते थैलीवाल्याचंच.छातीच्या बरगडी पर्यंत दोन्ही हात त्याचे रंगीबेरंगी थैल्यांनी भरलेले असत.त्यानंतर वान्यांची  दुकानं, सराफाची गल्ली,चप्पलांची थाटलेली दुकानं , उन्हाचा पारा चढल्यामुळे सुकलेला भाजीपाला , आणि ठसका लागणारे लाल मिरच्यांचे शेंडीतोर डोंगर आणि खुमासदार वासाची भातक्याची गल्ली त्यांनंतर सरतेशेवटी जाता जाता मला जायला कंटाळा वाटणारी सुकटाचीं पालं आणि तेथे गोंगावणाऱ्या माश्यांचा निरोप घेऊन बाजार संपत असे.आणि बाजार लवकर आटोपला तर परत येण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्यायच नव्हता.आमच्या शेजारच्या गावात एक नकलेश नावाचा होतकरू तरुण होता. त्याने कुठूनतरी एक जुना वापरलेला ऍटो घेतला होता. त्याचं नकल्याचा ऍटो असं नामकरण झालं होतं.हा ऍटो गावात पोहचे पर्यंत रस्त्यात कितीतरी असंख्य वेळा बंद पडत असे.किंवा पंचर तरी होत असे.
नकल्या ऍटो भरताना क्षमतेपेक्षा जास्त च भरत असे त्यामुळे लोकांचे हाल ही तेवढेच होत असत  कितीतरी म्हाताऱ्या  कोताऱ्या कंबरीच्या आजाराबद्दल नकल्याच्या ऍटो ला श्रेय देत असत.गावाच्या खालती एक अतिउंच टेकडी होती ती टेकडी आली म्हणजे ऍटोतील काही तरुण मंडळी खाली उतरायची आणि ऍटोला धक्का द्यायची असं मजल दरमजल करत शेवटी ऍटो गावात येत असे आणि दीर्घ प्रतिक्षेनतंर प्रवास संपून जाई.
                                           बाजाराची आणि गर्दीने खचाखच भरलेल्या बसची आठवण प्रत्येकालाच कदाचित येत ही असेल असं मला वाटतं.पण जेवढं मन बाजारात रमायचं तेवढं कानात कॉड घालून सुन्न पडलेल्या प्रवासी बसमध्ये आणि मॉल मध्ये कधी रमेल असं मला वाटत नाही.
        
         

Comments

  1. ग्रामीण जीवनातील गोडवा हरवत चाललोय आपण

    ReplyDelete
  2. खरच सोनेरीच दिवस होते ते

    ReplyDelete
  3. परिवर्तन हि काळाची गरज असते

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर आणि मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवणीतील शाळा

दि नॉन सिरीयस..