दि नॉन सिरीयस..

रविवार चा दिवस होता आम्ही सगळे मुलं खेळण्यात दंग होतो.आणि अचानकच खालच्या आळीतून बायकांचा जोर जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला.आवाजाच्या दिशेने पुढे गेल्यावर चिमा आज्याच्या दारात बायकांची असंख्य गर्दी होती.काही रडत होत्या तर काही समजूतदार बायका रडणाऱ्यांना धीर देत होत्या. पण झालं काय ? का रडतात ह्या मावल्या ?काही कळायलाच मार्ग नव्हता.कारण चिमा आज्या जैसे थे होता.घरी कोणी आजारी पण नव्हतं.आणि सगळी माणसं जागेवरच हजर होती.शेवटी कसातरी गर्दी बाजूला सारून पुढे गेलो आणि बघतो तर काय एका तासापूर्वी आमच्या सर्वांच्या गोट्या जिंकून आलेला नाऱ्या चित्ताताड पडला होता.त्याच्या तोंडातून पांढरा फेस येत होता.गावातल्या एका म्हातारीने त्याच्या नाकाजवळ कांदा धरला होता.आणि नाऱ्या हळूहळू शुद्धीवर येत होता.आणि नाऱ्याचं हे रूप मी पहिल्यांदा पाहत होतो. नाऱ्या आम्हा सगळ्या पोरांना एकाच गोष्टीसाठी परिचित होता ते म्हणजे नाऱ्याचा निशाणा.कितीही दूर गोटी असली तरी नाऱ्या ती उडवल्या शिवाय राहत नसे. खरंतर नाऱ्या म्हणजे एक अशी मूर्ती होती की जिचे केसं नेहमीच उभे थाटलेले असत.आणि त्या पोरसवदा वयात त्याच्या गालफडात तंबाखूचा विडा ऐटीत बसलेला असे.आणि त्याचे दात म्हणजे एखाद्या लोखंडी वस्तूवर गंज चढावा तेवढे गंजलेले होते.आणि एक डोळा त्याचा जरा जास्तच तिरपा होता.म्हणजे त्याला हेकना नाऱ्या म्हणण्या पर्यंत आमची मजल जात असे.नाऱ्या हा गावातील चिमा सावकाराचं शेवटचं रत्न चिमा आज्या ला एकूण नऊ अपत्य म्हणजे सहा मुलं आणि तीन मुली त्यात नाऱ्या हा शेवटचा.चिमा आज्या हा सगळ्या गावातून धनाढ्य शेतकरी होता.आणि गावातील सावकार ही होता पण त्याच्या अंगी गर्व शून्य होता.अशा सदन कुटूंबाचा नाऱ्या भाग होता आणि माझा बालमित्र पण नाऱ्याला असं काही होतं हे मला पहिल्यांदा माहिती झालं होतं.पण कदाचित आरोग्य शास्त्रात एखाद्या दुर्धर आजाराला किती नावं असावी त्याची मर्यादा पार करून लोकांनी त्याला भरपूर नावं दिली होती,कोणी म्हणे त्याला घुरं येतं,कोणी म्हणे झटका.तर कोणी म्हणे मिरगी.पण या वेळेस जे त्याला झालं होतं ते जरा जास्तच होतं.तेव्हा पासून आमच्या घरच्यांनी. त्याच्यापासून सावधान राहायला सांगितलं होतं. पण कमीतकमी आमची ही फक्त दोन दिवसांची आचार संहिता असेल.त्यानंतर नाऱ्या आमच्या घरी आणि आम्ही त्याच्या घरी.डॉक्टरांनी त्याला काही पथ्य पाळायला सांगितली होती.पाहिलं होतं पाण्या पासून दूर राहणे,दुसरे होते अग्नी पासून दूर राहणे आणि तिसरं होतं विजेपासून दूर राहणे. खाण्या पिण्याचं तसं काही पथ्य नव्हतं. पण जी पथ्य त्याला पाळायला सांगितली होती ती अक्षरशः त्याने पायदळी तुडवली होती. कारण आम्हाला पोहायला घेऊन जाणारा नाऱ्या,सर्वात आधी पाण्यात उडी टाकायला नाऱ्याच.कधी कधी नाऱ्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या पोरांशी पैज लावत असे ती अशी असायची कितीही फूट विहीर खोल असुदेत तळातून गाळ आणायचा आणि नाऱ्या त्यात कधीच हारायचा नाही. तसच विजेच्या तारेवर चोरून आकोडा टाकायला नाऱ्या पटाईत होता.त्याच्या सोबत मासे पकडायला जाणं म्हणजे सुरुवातीपासून शेवट पर्यंत जीव मुठीत धरून बसण्यासारखं होतं.कारण त्याची रीतच वेगळी होती.मासे पकडायला जायचं म्हणजे ते कधीच पूर्व नियोजित नसे.जे काही ते वेळेवर विशेषतः अशा कारनाम्याची सुरवात दुपारी बारा नंतरच होत असे.कारण घरची मंडळी सगळी आपापल्या कामाला निघून जात असत.आणि मग आमच्या भेटी गाठी आणि सल्ले होत असत.मासे पकडायचं ठरलं असेल तर नाऱ्या येतानाच साहित्य सोबत घेऊन येत असे.एक काळीकुट्ट वायरची थैली त्यामध्ये पन्नास साठ फूट वायर आणि त्या साठी लागणारा बांबूचा शेकाटा नाल्यात कुठे ना कुठेतरी असेच आणि आंम्हाला तो शोधायला कधीच जास्त वेळ लागत नसे. मी मास्यांना खाद्य टाकेपर्यंत नाऱ्याचा आकोडा टाकून लाईट टेस्टिंग ची प्रक्रिया पूर्ण होत असे आणि मग आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्यात करंट सोडल्या जाई आणि वेळेत तो काढून घाई घाई ने वायर गुंडाळून थैली घेऊन जागेवरून पोबारा करून धबधब्यावर जाऊन वाटाघाटी होत असें. बऱ्याच जणांनी धबधब्यावर बघितलं असल्यामुळे मासे कुठुन आणले यावर प्रश्नचिन्ह नसेच.पण एक खुमखुमी मात्र नक्की असायची की धबधब्यावर मासे कुणालाच सापडत नसत.बरीच माणसं रिकाम्या हातीच परत येत असत.आणि नेहमीच वर्दळीचा भाग असल्यामुळे मासे मागेच दबा धरून बसत.आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षा होलरा कडून शिकलो होतो.लक्षा होलर म्हणजे नाऱ्याच्या घरच्या सालदारापैकी एक होता पण अख्या पंचक्रोशीत शिकारीत त्याचा हात कोणी धरू शकत नव्हता. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याच्या सोबत असायचो.मी त्याच्या सोबत कमी असायचो पण नाऱ्याला त्याचा जास्त सहवास लाभला होता.त्यामुळे नाऱ्याने त्याची ही मासे पकडण्याची जीवघेणी पद्धत आत्मसात केली होती.आणि त्यात मी पूर्णपणे सहभागी असायचो. पुढे मला बोर्डिंग मध्ये घातलं(वसंतराव नाईक शिक्षण संस्था पळसखेड नागो जिल्हा बुलडाणा)आणि नाऱ्याची आणि माझी जास्त वेळ भेट होत नसे.पण कालांतराने काय होईना पुढे सातव्या वर्गासाठी नाऱ्याने आमच्या सोबत बोर्डिंग मध्ये प्रवेश घेतला आणि पुन्हा आम्ही वर्गमित्र झालो.आता इथे चोवीस तास आमचेच होते.त्यामुळे जेवने झोपणे सारखेच असायचे. नाऱ्याच्या त्या आजाराबद्दल विसरच पडला होता. पण एक दिवस नाऱ्याने आमची चांगलीच फटफजीती केली होती. चिलापाटी नावाचा एक खेळ आहे तो आम्ही खेळत बसलो होतो. नाऱ्या त्यात सहभागी नव्हता त्यामुळे तो आमची गंमत बघत बसला होता.आमचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं.आम्ही खेळून खेळून दमल्यामुळे नाऱ्याकडे जायला निघालो आणि नाऱ्याकडे लक्ष गेलं.बघतो तर नाऱ्या चित्ताताड पडून मातीत पाय खोरत होता.आणि त्याच्या तोंडाशी नितळ पाण्यासारखा फेस आला होता.जी मुलं आमच्या गावची नव्हती ती मुलं किळसवान्याप्रकारे आमच्या कडे बघत होती.आणि काही क्षणात आमच्या भोवताली बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.आणि त्यात आमचे त्याला शुद्धीवर आणण्याचे अथक प्रयत्न चालू होते.त्याच्या दोन्ही तळहातावर आणि दोन्ही तळपायावर अशी प्रत्येकी चार जण आणि एक जण छाती चोळत होता आणि एक जण आमच्यातला वाघ सरांना निरोप द्यायला गेला होता.आणि एक कांदा आणायला अशा परिस्थितीत त्याला पाणी पाजावे की नाही हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न होता आम्ही त्याला पाणी पाजनार तेवढ्यात गर्दीतून एकाने एवढ्यात पाणी देऊ नका असे सांगितले आणि तेवढ्यात कांदा आणणारा यशस्वी झाल्यामुळे दणक्याने कांदा फोडून त्याच्या नाकाला धरण्याची प्रक्रिया मी पूर्ण केली होती आणि वाघ सर मैदानावर येईपर्यंत नाऱ्या पूर्ण शुद्धीवर आला होता. पूर्ण वसतिगृहाच्या नशिबाने वाघ सर हे वसतिगृह अधीक्षकांखेरीज एक यशस्वी BAMS डॉक्टर सुध्दा ते होते.त्यामुळे नाऱ्याचा प्राथमिक उपचार शाळेतच झाला होता.तसं घरी कधी एरवी त्याला दवाखान्यात न्यायची गरज पडत नसे.पण त्या नंतर वाघ सर आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या परवानगीने घरी पाठवण्यात आलं.वाघ सरांनी या संदर्भात नाऱ्याच्या घरच्यांना समुपदेशन सुध्दा केलं होतं आणि काही चांगल्या डाक्टर चा मागोवा सुध्दा दिला होता. त्यानंतर मुंबई पर्यंत नाऱ्याच्या दवाखाण्याचा इलाज झाला होता.आणि दोन महिने त्याला तसं काहीच झालं नव्हतं.आता त्याच्या नातेवाईकांखेरीज सर्वांना आजार बरा झाल्याचा आनंद होता. तीन चार महिन्यानंतर नाऱ्या पुन्हा शाळेत आला होता.नाऱ्याला शाळेत येऊन एक महिना झाला असेल हिवाळ्याचे ते दिवस होते.शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा होती पिटीचा तास संपल्यावर दीर्घकाळ ओम..ओम...असा ओमकार चालू होता.उंची प्रमाणे रांग असल्यामुळे नाऱ्या माझ्या पुढेच होता ओंमकाराचे स्वर वाढत क चालले होते आणि तेवढ्यात नाऱ्या माझ्या मांडीवर बेशुद्ध अवस्थेत पडला सर्वांचे डोळे मिटलेले होते ओंमकाराच्या स्वरांत त्याचा पडण्याचा आवाज जीर्ण झाला होता.पण मी जोरात सर सर ओरडलो आणि पटकन त्याचं डोकं चपलीवर ठेवलं आणि पुनः तीच धावपळ तेच प्रयत्न आणि तीच बघ्यांची गर्दी. आता पुन्हा नाऱ्या घरी जाणार होता. परत त्याचे काही दवाखाने केले.पुन्हा तो चांगला झाला.आणि थेट आला तो परीक्षेलाच पण परीक्षेच्या दहा दिवसांत त्याला तसं काही झालं नाही.पण कसाबसा तो सातवी उत्तीर्ण झाला आठविला पण त्याचं नाव इथेच माध्यमिक ला हजेरीत आलं मात्र पूर्णवर्ष तो शाळेत आलाच नाही आणि थेट वार्षिक परिक्षेलाच आणि पुढे त्याने शाळाच सोडून दिली.आणि तो गावातच राहू लागला. पण त्या नंतर नाऱ्या असा जगला की त्याने त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव भासू दिली नाही.दोन्ही हाताची घडी घालून दुचाकी चालवणारा नाऱ्या मात्र आमच्या पंचक्रोशीत एकच होता.मला वाटतं नाऱ्याचा जन्म या डोंगर दऱ्यांमध्ये होण्याऐवजी जर एखाद्या हौशी महानगरात जर झाला असता तर नाऱ्या एक अस्सल बाइकर्स किंवा एक पट्टीचा जलतरणपटू तरी तो झालाच असता. कालांतराने दहावी बारावी आणि कॉलेज या कालावधीत मला गावापासून दूर राहावे लागले. आणि त्यानंतर आमची भेट झाली तेव्हा नाऱ्या लग्नासाठी मुली बघत होता.कशातही विक्रम करणारा नाऱ्या मुली बघण्यातही विक्रमी ठरला. अकरा मुली नाऱ्याने नाकारल्या होत्या.शेवटी "बगल मे छोरा और गांवमें दिंडोरा" या म्हणी प्रमाणे नाऱ्या वयाच्या २१व्या वर्षीच गावातील एका मुलीशी मे २०१३ मध्ये विवाहबद्ध झाला.पण नाऱ्याचा आजार काही कमी झाला नव्हता.अधून मधून त्याला मिरगी येतच असे आणि कोणीतरी वाटसरू म्हणा किंवा सोबतचे सहकारी यांच्यामुळे तो वाचतअसे.आणि पुन्हा त्याची दररोजची कामे सुरू होत असत.लक्ष देणारे तरी त्याच्याकडे किती लक्ष देतील कारण त्याचा आजार जीवघेनारा नक्कीच होता पण त्याला एकाजागी बसून राहता येईल असाही नव्हताच.पण अशा परिस्थितीत नाऱ्याला एक सुखद धक्का बसला आणि नाऱ्या एका गोंडस मुलाचा बाप झाला. २०१५ च्या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मी काही काळ गावी राहण्याचं ठरवलं होतं तेव्हा माझी वाट नाऱ्याच्या शेतातूनच होती. तेव्हा बऱ्याच वेळा नाऱ्या आपल्या मुलासोबत खेळताना दिसायचा तेव्हा नानाविध विचार मला त्याच्या त्या चिमुकल्या मुलाबद्दल आणि त्याच्या त्या जिवघेण्या आजाराबद्दल माझ्या डोक्यात घर करून जात असत.पण २०१५ च्या या उन्हाळ्यात झालेल्या अनेक भेटी ह्या माझ्यासाठी शेवटच्या ठरल्या. ४ फेब्रुवारी २०१६ हा नाऱ्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस.नाऱ्या जाण्यास निमित्त ठरलं ते अर्धा फूट खोल आणि एक मीटर रुंदीचं पाण्याचं डाबुक.दुपारचे बारा साडेबारा वाजले असतील नाऱ्या बैलांना पाणी पाजण्यास घेऊन गेला नाऱ्या बैलांना पाणी पाजत असताना मिरगी ने नाऱ्यावर शेवटचा घात केला आणि हरहुन्नरी नाऱ्या क्षणात या जगाला मुकला. नाऱ्याचं हे आव्हानात्मक जीवन संपुष्टात आलं असं म्हणण्यास वावगं वाटणार नाही.पण नाऱ्या जे जगला त्याला अजिबात तोड नाही. कोणतीही समस्याग्रस्त व्यक्ती कुठल्याही दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला जी समुपदेशनाची गरज असते ती नाऱ्याने कधी घेतलीच नाही. आणि कधी तो समस्याग्रस्त आहे हे त्याने कधी मान्यच केले नाही.नाऱ्याने शेतात कामं केलीच पाहिजे असं अजिबात नव्हतं प्रत्येक्षात घरून त्याच्यावर बंदी होती.पण नाऱ्यामध्येच एक वेगळंच औदार्य होतं जे त्याच्या पंचवीस वर्षाच्या आयुष्याला चार चांद लावून गेलं......पण मित्रांच्या मांदियाळीत नाऱ्या गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती कधी भरून निघणार नाही.


(नाऱ्या बद्दल एवढया आठवणी लिहून काढाव्यात वाटण्यास कारण आज त्याचा २८ वा वाढदिवस होता.)

Comments

Popular posts from this blog

आठवणीतील शाळा

बाजार