सखे सोबती..
आता पर्यंत च्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटल्या ज्यांना मी विसरू शकत नाही.कारण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ह्या त्यांनी आपल्या आयुष्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्या आपल्या आठवणीत कायमच्या असतात.पण मला वाटतं हे केवळ समाजीकरणाच्या साच्यात घडलेल्या मानव या बुद्धिमान प्राण्यापुरतच मर्यादित नाहीये तर. त्यामध्ये मानवेतर प्राण्यांचा सुद्धा समावेश असतो. तर असच माझ्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सिंहाचा वाटा आहे तो माझ्या परिवाराचा एक भाग असणाऱ्या माझ्या इमानदार कुत्र्यांचा.जेव्हा मी इयत्ता पहिलीत असेल तेव्हा मला माझा पहिला कुत्रा आठवतो तो म्हणजे " मुंजा " घरातील सगळे लोक त्याचा मुंज्या कुत्रा असा नामोल्लेख करत असत.पूर्ण अंगाने काळा आणि तोंडावर तेवढा तांबडा असल्यामुळे त्याला मुंजा असं म्हणत.इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत तो माझ्या सहवासात होता आणि मी त्याच्या.या चार वार्षिक आयुष्यातील त्याचे खूप किस्से असे आहेत जे माझ्या आठवणीत आहेत.शिरवा आणि धनगरवाडा या दोन्ही गावात आमची घरे आहेत आणि दोन्ही गावांच्या मध्ये आमचं शेत आहे.धनगर वाड्यातून रात्री अपरात्री जर आपत्कालीन परिस्थितीत काही प्रसंग आला तर मानसांनी नकार दिल्याचं मी बरेच वेळा बघितलेलं आहे.आणि अनुभवलेलं ही आहे.दुसरीत असताना एकदा रात्री बारा साडेबारा वाजता मला विंचू चावला.वेदना असह्य होत होत्या गावात मांत्रिक नसल्यामुळे शिरव्याला जायचं ठरलं सगळा गाव माझ्या रडण्याने जागा झाला होता.पण जेव्हा रात्री एक वाजता दोन किलोमीटर अंतर चालून दुसऱ्या गावात जाण्याची वेळ आली तेव्हा सोबतीला कोणीही नव्हतं माझा मामा मला खांद्यावर घेऊन एकटाच निघाला होता.थोडं गावाच्या बाहेर पडलो असेल मागून कोणीतरी येण्याचा भास झाला मामा जागेवरच थांबला बघतो तर मुंज्या आमच्या सोबत येत होता.असे कितीतरी रात्रीचे प्रसंग असतील त्या प्रत्येक वेळेला मुंज्या आमच्या सोबतीला असे.असेच एकदा तिसरीत असताना माझी आई माझा मामेभाऊ आणि बरीच कुटुंबातील सदस्य आम्ही शिरव्यातून वाड्यावर निघालो होतो सोबत मुंज्या ही होता.मी मस्ती करत हसत खिदळत चाललो होतो तेव्हा कुठून डोक्यात कल्पना आली कुणास ठाऊक मी मुंज्याच्या पाठीवर स्वार झालो आणि म्हणालो मुंज्या पळ..मुंज्या जोरात पळायला लागला आणि मी जोरात खाली आदळलो दोन्ही गुढगे जागेवरच रक्तबंबाळ झाले आणि आईने चोप दिला तो वेगळाच.पण आई जवळ येईपर्यंत मुंज्या माझ्या जवळच बसून होता.आणि एकदा मी चौथीत असताना रंगपंचमीचा दिवस होता मी रंग खेळून झाल्यानंतर शांत बसलो होतो आणि बाजूलाच मुंजा सुस्त पडला होता.पण त्या नंतर एक मुलांचा घोळका आला आणि त्यांनी मला रंग लावण्याचा प्रयत्न केला पण ही गोष्ट काही मुंज्या ला सहन झाली नाही त्याने त्याच्या प्रकारे मध्यस्थी घेऊन सगळ्यांना माघारी परतवले.पण त्यादिवशी मी सगळ्यांना रंग लावून मुंज्या च्या शेजारी जाऊन बसायचो रंगपंचमीचा खरा आनंद मी मुंज्या मुळे घेऊ शकलो होतो.पण मुंज्या सोबत असण्याची ती रंगपंचमी शेवटची ठरली. त्याच्या दोन महिन्यांनंतर मुंज्या हे जग सोडून गेला.त्याला काय झाले कुणालाच कळले नाही अचानक चक्कर येऊन मुंज्या खाली पडला आणि तिथेच त्याने जीव सोडून दिला.तो गेल्याच आम्हा भावंडांना माहीत नव्हतं.सकाळची शाळा होती.रोडने येताना मुंज्या रस्त्यात झोपलेला आम्हाला दिसला.एरवी आमचा आवाज दुरून जरी त्याच्या कानावर आला तरी तो पुढे यायचा पण त्या दिवशी आवाज देऊन ही तो उठला नाही शेवटी त्याच्या जवळ गेल्यावर त्याला उठून उभं केलं आणि तो जोऱ्यात कोसळला तेव्हा लक्षात आलं की मुंज्या गेला...त्या दिवशी कामावर गेलेल्या घरातल्या लोकांच्या भाकरी संध्याकाळी जशाच तशा परत आल्याच मी पहिल्यांदा बघत होतो. संध्याकाळी घरात कंदील लागला पण चुली मात्र पेटल्याच नाही.... दोन वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेलेला " काळू " हा देखील माझ्या दीर्घकाळ स्मरणात राहील असा कुत्रा होता.त्याला मी स्वतः घेऊन आलो होतो असं म्हणण्यापेक्षा मी त्याला खूप माझ्या जवळच केलं असं मी म्हणेन.माझं पदवीचं पहिलं वर्ष संपलं होतं.उन्हाळा असल्यामुळे आम्ही घरीच बांबूची कामं करीत बसलो असायचो. गावात कुत्र्यांची लढाई झाली की त्यात एक आजाराने जर्जर झालेल्या कुत्र्याचा आवाज यायचा.मी एक दिवस जाऊन बघितलंच तर एक काळकुट्ट कोल्ह्या कानाचं मरणासन्न पिल्लू विव्हळत होतं. मी त्याला तिथून घरी आणलं घरी पण ते सगळ्यांना भीतच होत.त्याच्याकडे कुणी बघितलं तरी ते रडणं सुरू करून द्यायचं तसंच ते पायात पण लंगडं होतं. कालांतराने त्याला आमची सवय पडली आणि त्याचा पायही चांगला झाला.तो रंगाने काळा असल्यामुळे त्याच काळू असं नामकरण आम्ही केलं होतं. नंतर पावसाळा चालू झाला आणि आम्ही शेतात रहायला आलो.आणि विशेष म्हणजे काळू ला इथलं वातावरण एवढं मानवलं की तो जणू आमची ढाल च झाला.पशुपालनाचा व्यवसाय असल्यामुळे सगळी धुरा ही काळू वर अवलंबून होती. काळू ची जास्तीत जास्त मैत्री आई सोबत होती. आई ला शाळेत ने आण करण्याची विशेष जबाबदारी काळूनेच स्वीकारली होती. आई शाळेत जाण्याची तयारी करत असली म्हणजे काळू आई येण्याच्या आधी रस्त्यावर हजर असायचा.त्याची कामं ही त्याच्या मुडवर अवलंबून असत कधी कधी तो चारणी ला ही सोबत जात असे. एकदा मी असाच नवखा चारणीला गेलो होतो.मी दाट झाडीत अडकून पडलो बाहेर निघताच येत नसे जीव रडकुंडीला आला पण रस्ता सापडत नव्हता.शेवटी काळू ने मला सहीसलामत मुख्यरस्त्यावर आणून सोडले होते. शेवटी काळू सुद्धा एकदिवस आम्हाला सोडून गेला . पण आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे औषधोपचार करण्याची संधी त्याने आम्हाला दिली . ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी आई ला शाळेत सोडून तो घरी येत होता पण मध्येच तो हे जग सोडून गेला. आज त्याचीच पैदास आमच्या घरी आहे आणि केवळ आणि केवळ लाखोंची उलाढाल होते ती त्यांची प्रामाणिक साथ असल्यामुळेच आणि त्यांच्या मुळेच आज आमचं असण्याचं अस्तित्व आहे...त्यामुळे त्यांना कधी विसरू शकत नाही.


Comments
Post a Comment